Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

प्रदीर्घ आणि मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

शहरा

तुझ्या जमिनीवर पाय ठेवल्याबरोबर
माझी नजर अडकते
सिनेमांच्या पोस्टरवरील
नट्यांच्या उत्तान स्तनांवर.

नंतर मी जेव्हा हिंडून घेतो
झगमगीत बाजारपेठेतून
विंडोशॉपिंग करीत
तेव्हा क्रीम आणि सेंटच्या तीव्र सुगंधामागे
घसटत जाते माझी वासना कितीतरी दूर.

मला सतत वाटते भीती
कुणीतरी कापेल माझा खिसा
म्हणून टेलरकडून तो
मुद्दाम बनियनच्या आतून शिवून घेतलाय.

मला वाटते नेहमी धास्ती
गल्लीबोळातून शॉर्टकट घेताना
कुणीही लावेल चाकू
म्हणून मी पक्क्या सडकेनेच फिरतो;
तर मला पाळता येत नाहीत
तुझ्या रहदारीचे नियम संपूर्णपणे.

म्हणून काय-
रिक्षावाल्याने मला आईवर शिवी द्यावी,
सायकलवाल्याने धक्का मारावा,
स्कुटरवाल्याने खाऊ की गिळू पहावे,
कारवाल्याने अंगाला चाटून जावे,
आणि ट्रकवाल्याने चिरडावे
किड्या-मुंगीसारखे.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP