तुको बादशाह

मंबाजी,
तुमचे आभार मानावे
तेवढे थोडेच.

तुमच्या वाकड्या सहाणेने
लावली शब्दांना अभंग धार
नि
वीणेला दिला
तुमच्या तेढ्या खुंटीने आधार.
तुमच्या दगडी भिंतीशिवाय
एवढा उसळलाच नसता
‘त्रिगुणांचा चेंडू’.

तुमच्या विज्ञानाने तर
कमालच केली मंबाजी,
पूर्वी त्यानं
भिंतीला मोटार काय लावलीन्
रेड्याच्या मुखी स्पीकर काय बसवला.
अन्
आता
बनवलं
खास विमान
तुक्याचा देह उडवण्यासाठी.

तुम्ही
असे टाचा उंचावून
त्याच्या शेजारी उभे राहिले
की तो आकाशाहूनही मोठा वाटतो.

साध्यासुध्या गावकर्‍यांच्या
हृदय-सिंहासनावर
त्याला विराजित करण्यात
तुमचा वाटा आहे सिंहाचा
आणि
तोच आहे
तुमच्या मुक्‍तीचा मार्ग:

मिळवा
तुमचा सानुनासिक स्वर
त्यांच्या घोषात-

बोऽल
तुकोऽबादशाऽऽकीऽ
जयऽऽ!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा