पूनम उर्फ राणी पाटील

अहिंसेचं तत्त्वज्ञान
सार्‍या जगाला शिकविणार्‍या
महात्म्याच्या नावानं उघडलेल्या
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात
झालेले चाकूचे वार
नव्हते तुझ्या गळ्यावर;
ते होते
स्त्रीत्त्वाच्या मंजुळ कंठातून
फुटणार्‍या मायेच्या बोलांवर,
सुगंध वाटणार्‍या ममतेच्या फुलांवर
आणि
गळ्याच्या त्वचेला साक्षी ठेवून
मायची आण घेणार्‍या
निरागस मुलांवर.

पूनम,
कोणत्या अमावस्येच्या तिमिराने
गिळून टाकले
माऊलीचे पसायदान,
तुकोबाचा कळवळा,
जोतिबाची तळमळ,
सावित्रीबाईचे धडे
आणि
बाबासाहेबांचे जागरण.

आता
या महाराष्ट्राने
कोणत्या तोंडाने करावे सांत्वन
तुझ्या माय माऊलीचे?

शंभर टक्के जळालेला देह
मरणाच्या वाटेवर
धुगधुगत्या तुझ्या कायेला
ओढू पाहतो जवळ
एवढी विकृत वासना
आणि आम्ही म्हणावे त्याला
एकतर्फी प्रेम!

‘ढाई आखर प्रेमका’
आम्हाला पढवणारा कबीर
प्रेमाचा हा अनर्थ पाहून
घालतो शरमेने मान खाली;
ती वर उचलण्याची
त्याला आता लाज वाटते.

मायबाई,
तुझ्या पायाचे तीर्थ घेण्याची
लायकी नसलेल्या
आणि कलात्मक तटस्थतेने
समकालीन वास्तवाच्या
रोमँटिक कविता लिहिणार्‍या
आम्हा शब्दप्रभूंना
तू क्षमा कर!

साहित्यशास्त्राच्या बांधणीला तोडून
नि अवघा डोंगर पोकळ ठेवणार्‍या
परंपरांना मोडून
महात्म्यांचा उद्रेक
तुझ्या रक्‍ताने लिहितो
आजच्या तारखेवर दोहा-

प्रेम राहिले दूर रे, मागून मिळेना भीक;
ज्ञानमंदिरी येउनी एवढे तरी तू शीक!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा