एका तरुण मुलीचा वाढदिवस

सक्काळी
सक्काळी
डोळे मिचकावून ‘आय किस’ घेत
आरसा म्हणाला-
कितवा वाढदिवस ?
अस्सं तरुण मुलीला
विचारत नसतात भिडू.

लाडे लाडे उत्तर दिलं खरं;
पण मनाची प्रश्नपत्रिका सोडवायची कशी ?
एका वर्षानं आपण वाढतो ?
म्हणजे नेमकं काय वाढतं ?
- घरी परतायला उशीर झाल्यावर बापाची काळजी ?
- की ‘पिरियड’ लेट होण्यानं
आईची चिंता ?
- की उमलत्या अंगानं
न्हाणीघराची फिकर ?
काय वाढतं ?

लेटेस्ट डिझाईनचा खुला गळा ...
सेलिब्रेशन ...
सरप्रायझिंग पार्टी...

ग्रिटिंग्ज ...
प्रेझेंटस्‌ .
दिवसभर वाटतं आगळं वेगळं
सूर्य मावळला की शिळं सगळं.

दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा
किराण्याचा ‘क’ मोठा होत जातो
कवितेपेक्षा
अन्‌  वयाचा वाढता आकडा
खसकन्‌ धसतो काळजाच्या मासोळीत.

या उग्र सेंटस्‌च्या गर्दीत
नाही का
आयुष्यभर मंदमंद दरवळणारे
एखादे तरी अत्तर.
आणि भेट मिळालेल्या पेनसेटमध्ये
हक्काने तुझे नाव लिहू शकेल
अशी सोनेरी शाई.

मी शोधते -
शोधत राहते -
पुढच्या वाढदिवसापर्यंत.

(पूर्वप्रसिद्धी : ‘देशोन्नती’दिवाळी ०८)

४ टिप्पण्या: