कविता

कवितेला
शमविता येत नाही
कोणतीच शारीरिक भूक;
की तिला काढता येत नाही
एखादा इंटरव्ह्यू कॉल
कवीसाठी
कवितेला पिताही येत नाही
दारु-सिग्रेटसारखे

माणसाला लागणार्‍या
कुठल्याच गोष्टीचा पर्याय
होऊ शकत नाही
कविता़

कवितेला
सावरता येत नाही
वृद्ध बापाचा तोल
मामुली काठी बनून;
की तिला लोटताही येत नाही
म्हातार्‍या मायच्या घशात अडकलेला
शिळ्या भाकरीचा घास

कवितेला होता येत नाहीत
कोणत्याच अपंगाच्या कुबड्या
तिला पुसता येत नाहीत
विधवेचे अश्रू;
की तिला अडवताही येत नाही
आपल्या प्रेयसीचे
दुसर्‍याशी होत असलेले लग्न

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या
कवितेच्या कागदाला
झाकता येत नाही
फाटक्या झ्यांपरातून दिसणारे
तरूण बहिणीचे उघडे अंग;
की मासिकात छापून आलेल्या
कवितेच्या
चतकोर कात्रणाचे
लावता येत नाही ठिगळ
लहान भावाच्या
ढुंगणावर फाटलेल्या चड्डीला.

२ टिप्पण्या: