रांगोळी

सड्यासाठी नाही शेण.
नसू दे.

शिंपडायला ओंजळभर पाणी
वाचवलं तुझ्या बायकोनं.
तेच खूप आहे.

तिला म्हणावं,
फार थेंब घालू नकोस.
त्यांना
परस्परांशी जोडताना
तीच जाते तुटत.


महाग झालेत.
होऊ दे.
पण
चिमूटभर
आपल्या आवडीचे
रंग भर.

हुंदडू दे
लेकरांना मनसोक्‍त.
बघ:
मोडू नये म्हणून
ते रांगोळीहून
कसे अल्लद
उडी
मारताहेत.

२ टिप्पण्या:

  1. डॉक्टर साहेब,
    आपल्या कविता फार छान आहेत. गेय, अर्थपूर्ण आहेत. सामान्य जनजिवनाचे सम-ग्रामिण जिवनाचे सुंदर चित्रण दिसुन येते.

    उत्तर द्याहटवा
  2. संगीताजी,
    आपले मन:पूर्वक आभार.
    - डॉ. श्रीकृष्ण राऊत

    उत्तर द्याहटवा