माती

क्षणोक्षणी
ढेकळाढेकळांनी
जागच्याजागी
विरत जाणारी ही माती.

नव्या चुलीचे नवे घर
बांधीन म्हणते आडव्या उभ्या भिंतीचे,
मालकीसाठी लावीन म्हणते भांडणे
सूर्यकिरणातील रंगात
आणि फुटल्या नाकपुडीला
हुंगवील म्हणते
काळे फूलही.

सावत्र गिलाव्याने
बुजवीन म्हणते नळे
त्यावर पोतेरा घेऊन होईन म्हणते
आरशासारखी स्वच्छ़
पावसात परिमळताना.
खेळवीन म्हणते पीक अंगाखांद्यावर.
पाखरांना पाणी पिण्यासाठी
घडवीन म्हणते
नव्या घागरी.

असे
घ्याल तेवढे देईन
म्हणते
द्याल तेवढे घेईन.
देता घेता झिजून
राहीन म्हणते निजून
करून
पाठीचे अंथरूण
पोटाचे पांघरूण.

हाडाहाडांनी कुरकुरत
राहीन म्हणते
निरंतर
भिजत,
कुजत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा