फुले

आसमंताचा
संबंध गाभारा
सुगंधित करायला निघालेल्या
फुलांच्या सर्जनशील परागांवर
कोठून येऊन बसतात
ह्या काळया माशा झुंडीझुंडीने?
ज्या शोषून घेतात
आतील मध हळूहळू़.

जसे चालले आहे
निर्बिजीकरण.

पाकळ्यांच्या माना
लुळ्या पडत आहेत
लाजिरवाण्या जगण्यासारख्या
आणि
फुले होत आहेत
प्लॅस्टिकच्या फुलांसारखी
फक्त पत्लॉवरपॉटच्या लायक.

कोवळया उदयापासून
चिमत चिमत मिटणे टाळतांना
फुले अवघडलेली.

भरबहरात
फुलांचे उडणारे रंग पाहून
फुलपाखरंही जातात दुरून,
होतात पाठमोरी.

तशी
फुले अधिकच तिरस्कार करतात
आतील आवाजाचा
त्यांची
समजुतदार सज्ञान देठं
गलबलतात खोलवर
आणि
बागेच्या डोळ्यात
साकळते दंव
वेळी अवेळी
अधूनमधून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा