एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला




एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर 
जन्म घेणा-या तान्ह्या मुला -
एकविसाव्या शतकाच्या
उंबरठ्यावर 
जन्म घेणा-या
तान्ह्या मुला,
गर्भातच व्हावे 
तुझ्यावर चांगले संस्कार
म्हणून 
तुझ्या आईने
तू पोटात असताना
जो ग्रंथ वाचला होता;
तोच 
वाचतो आहे मी
मन:शांतीसाठी
तुला जवळ घेऊन,
आणि हे काय - 
तू चक्क लघवी केलीस त्या ग्रंथावर !
माझ्या मराठी मनावर
फुटलेत कित्येक बल्ब
कॉन्सेंट्रेटेड ऍसिडचे.
‘संपूर्ण ज्ञान हे अज्ञानासारखे असते’
मी वाचले होते कुठे तरी.
त्या शास्त्राधारावर
मी तुला क्षमा करतो.
आणि 
त्या ग्रंथाच्या पानावर
ती जळणार नाहीत
इतकी गरम झालेली
इस्त्री फिरवतो.
बैठकीतला देवाचा फोटो
मी भिरकावरला सैपाकघरात,
पितळेच्या देवांना कोंडले
चांदीच्या देवघरात,
विविध तर्क देऊन बंद पाडलेत
तुझ्या आईचे उपास-तापास.
सैपाकघरातला देव तिचा,
बैठकीतली पुस्तकं माझी;
झोपण्याचा पलंग मात्र दोघांचा
अशी केली घराची वाटणी.
दहा वर्षे झाली
तरी
तुझ्या आईच्या मनातून
मी 
देव
काढू शकलो नाही.
तू निर्माण झालास 
आमच्या -
नवराबायकोच्या
या द्वैतापासून.
तान्ह्या मुला,
टवटवीत गुलाबपाकळीसारख्या
तुझ्या मऊ मुठीत
दिली आहे मी माझी तर्जनी.
कवितेतील
तोकड्या
शब्दांना
किंवा 
रंगीत छायाचित्रणाच्या 
मृत यांत्रिकतेला
पकडता येत नाही
तुझ्या हसण्यातील आनंदाचा जिवंत झरा
अन् ते पाहून येणारी
माझ्या मनाची प्रसन्नताही.
तुला हसताना पाहून
मी विसरतो -
माझं अपंगत्व,
महारोगानं झडणारी
दादांच्या हातापायांची बोटं,
आभाळाला भिडणा-या वस्तूंच्या किंमती,
आईची फाटलेली पातळं,
माझ्या डोक्यावरील
कर्जाचा डोंगर, गळणारे केस,
डोळ्यांभोवती वाढणारी काळी वर्तुळं,
क्षीण होत चाललेलं पचन,
आणि 
या सर्वांसकट
माझ्या-तुझ्या भविष्याची चिंता
क्षणभर.
तुला म्हणतो मी,
‘‘ मुला,
देवाघरच्या फुला !’’
तर 
फुलात दडून बसणारे
बॉम्ब
फुलांना करतात बदनाम
तेव्हा
मी तुला काय म्हणू
माझ्या पिला ?













एकविसाव्या शतकाच्या 
उंबरठ्यावर 
तुझ्या सानुल्या पावलांचं स्वागत
मी कसं करू ?
कुठं करू ?
खेड्यातल्या ‘भारतात’?
जिथं
अजूनही
बायांची गोदरी
आणि 
माणसांची हागदोरी
आहेत एकमेकांना खेटूनच;
रस्त्याच्या कडेला
देहधर्म उरकणा-या बायांना
करावी लागते ऊठबस
माणसं रस्त्यानं जात येत असलीत की.
मुली प्रसाधनाकरिता
नि मुलं व्हिडिओसाठी
विकतात घरातली ज्वारी.
वावरात मालक
मजुरांना लावू देत नाही हात
तुरीच्या चार हिरव्यागार शेंगांना.
द्विभार्या प्रतिबंधक कायदा
लाजेने घालतो मान खाली
पाहून
मध्यरात्रीचा शृंगार
धाब्यात
अन्
उत्तररात्रीचा
वावरातल्या 
झोपडीत.
राजकारण हा 
सधन शेतक-यांचा 
आणि 
‘शेती हा 
शिक्षकांचा
झाला आहे मुख्य व्यवसाय.
मरणादारी
वा
तोरणादार
‘देसाळ’ झाली
भलतीच प्यारी.
सायंकाळी
घराच्या ओढीनं
बैलांनी उचलावीत भराभर पावलं
गळ्यातील घुंगुरमाळांच्या नादात
तशा
हारी लागल्या मुली
उरकतात भुलाईची गाणी पटापट
‘चित्रहार’साठी.
सांजवेळी
सवयीनं लागतो दिवा
देवघरात, तुळशीपुढं;
पण
कॉस्टिक सोड्यानं धुवून काढलं
मुलांच्या ओठांवरून
शुभं करोति ... ’
आता आमची
भूपाळी आणि शेजारती
केवळ एकच:
वॉशिंग पावडर निरमा. 
वॉशिंग पावडर निरमा.
टी.व्ही. वरील जाहिराती पाहून
तुझी आठ वर्षाची बहीण
विचारते मला,
‘‘निरोध म्हणजे काय ? ’’
काय सांगू तिला ?
सांग माझ्या मुला.
अन्न, वस्त्र, निवारा
हे तीन आमदार
बंडखोरी करून
‘आवश्यक’ गरजेतून
‘चैनीच्या’गरजात
करतात पक्षांतर
तेव्हा अर्थशास्त्राचे सिद्धांत 
पाहतात
तोंडात बोट घालून.
मग
बारोमास
उघड्या अंगानं
अन्नदाता घेतो सनबाथ.
पावसाळ्यात
गळणारी छपरं
संपूर्ण घराची बाथरूम करून
शॉवर लावतात नेमका चुलीवर;
ओल्या लाकडांच्या धुराचा
प्रतिकार करता करता
फुटतात डोळे अन्नपूर्णेचे.
खेड्याचीही 
झाली आहे प्रगती.
इथे आता
आत्महत्या करणारा
लावून घेत नाही गळफास
किंवा
जवळ करीत नाही विहीर.
तो पत्करतो
सुलभ मार्ग
एन्ड्रीन, डेमॉक्रॉन ...
एकविसाव्या शतकाच्या
उंबरठ्यावर
तुझ्या नवजात पावलांचे
आदरातिथ्य मी कसे करू ?
कुठे करू ?
शहरातल्या ‘इंडियात’?
जिथे
घरी आलेला पाहुणा
जेवून जात नाही तर बरंच आहे
असं वाटतं शहरांना.
शहराच्या
मासिक अंदाजपत्रकात
जीव जाण्यापूर्वी जमिनीवर टाकलेल्या 
माणसाच्या धुगधुगीसारखी
अजून आहे
चहापाण्याची तरतूद.
- हे काय कमी आहे ?
‘‘पैसा
साध्य नसून
साधन आहे’’
हे तत्त्व सांगणा-या आजीला
शहर म्हणतं,
‘‘मूर्ख कुठली!’’
आणि 
तोंडाला फेस आल्यावरही
न थांबता
छाती फुटेपर्यंत
शहर धावतं पैशाच्या मागे.
आजीचं
समजावणं असतं सुरूच,
‘‘पैशानं सगळं काही भेटते बाप्पा
पण मायबाप नाहीत भेटत!’’
तर 
शहर म्हणतं,
‘‘गलत ! एकदम गलत !
झुठ ! सरासर झुठ !
वीर्यदान करणारा बाप
आणि
गर्भाशय भाड्यानं देणारी आई
आहे ना माझ्याजवळ ! ’’
हताश होऊन म्हणते आजी -
‘‘मी मेल्यावर
जाळू नको मला
विद्युतदाहिनीत,
खेड्यावरच्या नदीकाठी
रचशील माझी चिता
शहर म्हणतं हसून,
’’आजी,
एवढी चैन
कशी परवडणार आहे आपल्याला ? 
आणि 
लाकडं कुठं शिल्लक आहेत खेड्यावर ?’’
मग
आजी
मिटते डोळे
जिवंतपणीच.
जागल्याच्या
डुलकीची वेळ आहे माहीत
आणि 
तो येऊ शकतो केव्हाही
याचा धाकही आहे ज्यांना
अशा
चटावलेल्या मोकाट ढोरांनी
कुंपणातून तोंड खुपसून
अधाशासारखी
भराभर खावीत
हिरवी पिकं
- तशी
शहरं खात आहेत माणसांना.
शहरात
पोटामागे पळपळ पळणारांना
कॅलेंडरची पानं उलटायलाही 
नसते फुरसत;
वाढणारे
अंगावरचे केस
अन् बोटांची नखेच
काळ पुढे सरकल्याचे सांगतात.
या कॉन्व्हेंटी संस्कृतीत
आईचे दूध पिल्यावर
तिला तू 
‘थँक्यू’
म्हणू नकोस;
श्यामच्या आईला
ते कदापिही
आवडणार नाही.
पुस्तकांच्या ओझ्याने
तुझ्या भावाबहिणींच्या पाठीला येणारे
पोक पाहून 
तिचे काळीज
तीळतीळ तुटते रे.
‘Happy’
पंचवीस वेळा
लिहून
लिहून
लिहून
तू होशील
चक्क दु:खी
इवलाली बोटं चेपत
आणि तेव्हाच -
मी असेन
जगाच्या पाठीवर कुठेतरी
हारतु-यांच्या गर्दीत,
पोरीबाळींच्या घोळक्यात,
टाळ्यांच्या गजरात,
मायबोलीचे गोडवे गात :
‘‘अमृतातेही पैजा जिंके ....’’
तान्ह्या मुला,
तुझ्या शिक्षणाची
नाही मला काळजी
जरी
ओस पडताहेत महाविद्यालये
आणि भरभराटीस येत आहेत
समांतर कोचिंग क्लासेस.
कोणत्या
ज्ञानशाखेची पदवी
पाहिजे तुला सांग?
अभियांत्रिकी?
आयुर्विज्ञान ?
अणुऊर्जा ?
सबूर !
जरा सबूर !
ह्या पहा
आलिशान शोकेसेस सजताहेत;
थोड्याच वेळात
लागणार आहे
इथे पदव्यांचा जंगी सेल.
तान्ह्या मुला
सांग मला,
जन्म घेणा-या 
मुलींच्या कपाळावर
गर्भातच कोणत्या सटवीनं
उमटविली
तप्तमुद्रा -
‘Use and throw’
श्रीमंताची पत्नी
असते सगळ्यांची ‘बहेनजी’
आणि 
गरिबाची बायको
सर्वांची ‘भाभी’
- अशी चवचाल या शहराची
नातीगोती.
एकाच स्त्रीचे दोन हात
दोन दिशांना
ओढणारे
बापलेक
एकाच पुरूषाच्या
दोन्ही बगलेत
खिदळणा-या 
मायलेकी.
मुले विचारतात बापांना
आणि मुली आयांना -
‘‘आमची सोय 
लावता येत नाही नीट
तर आम्हाला पैदा करण्याचा
शौक तरी कशाला केलात ?’’
भगवान् कृष्णा,
अशीच असते का रे बाबा 
धर्माला येणारी ग्लानी ?
आणि जर असेल 
तर 
आणखी किती
जन्माष्टम्या जाव्या लागतील
तुझी वाट पाहत?
अपघातात
डोळ्यात खुपसावी
गॉगलची फोटोसनी धारदार काच
तसे भोसकते तुझे भविष्य मला,
माझ्या तान्ह्या मुला !
पश्चिमेकडून वाहणा-या
या हवेत
नाही म्हणायला
अजूनही
औपचारिकपणे का होईना
माणसं करतात
एकमेकांची सांत्वनं.
दस-याला घेतात ऊरभेटी,
लावतात छातीला छाती,
भिडवतात हृदयाला हृदय,
पण काही केल्या
या हृदयीचे
त्या हृदयात जात नाही.
दोन हृदयात पडले आहे
हजारो मैलांचे अंतर
जे कापता येत नाही
लेसर किरणांच्या अत्याधुनिक
करवतीला.
ते चालले सतत वाढत
भूगर्भातील बदलांमुळे
दरवर्षी अपरिहार्यपणे वाढणा-या
हिमालयाच्या उंचीसारखे.
माणसं पाठवितात
दिवाळीची शुभेच्छापत्रे
आपल्या प्रिय व्यक्तींना कमी;
व्यावसायिक संबंधितांना जास्त.
हिंदू साम्राज्यासाठी
छत्रपतींवर
सोयराबाईंनी
खरोखरीच
विषप्रयोग केला होता की नाही
ठाऊक नाही ;
पण
एखाद्या तुटक्यामुटक्या घरासाठी
देखील
बापाच्या खुनाचा कट करणा-या
औलादीचा
पंचविसावा वाढदिवस साजरा होतोय
धुमधडाक्यात.
पैसे कमी पडले म्हणून
आईसाठी
यार शोधणा-या देशभक्ताची
होत आहे सुवर्णतुला.
ढुंगणावर झाड फुटले तरी
सावली झाली
म्हणणारी बेशरम नवी पिढी -
मसाल्यात शिजलेले मांस,
जास्त टक्केवारीचे अल्कोहोल,
सुगंधित तंबाखू
आणि
कोणत्याही योनीत
शोधते
जीवनाचा परम अर्थ.
अंदाजपत्रकातील 
तूट भरून काढण्यासाठी
अर्थशास्त्रज्ञ सुचवीत आहेत
अनुत्पादक खर्च कमी करायला
आणि 
लोकसंख्येला आळा घालायला.
म्हणून म्हाता-यांवरचा खर्च अनुत्पादक 
ठरवून त्यांच्याकरिता
‘इच्छामरणा’चे विधेयक संसदेत
एकमताने मान्य होण्याचा
दिवस दूर नाही.
उठली तर लवंग
बसली तर विलायची
एवढी विशाल संस्कृती
जन्मत आहे
माझ्या तान्ह्या मुला,
तुझ्यासोबतच
तुझं जुळं म्हणून.











एकविसाव्या शतकाच्या
उंबरठ्यावर
जन्म घेणा-या
तान्ह्या मुला,
तुझे बालपण संपेल -
खेळण्यात नव्हे,
व्हिडिओ गेम्स पाहण्यात.
व्हिडिओच्या स्क्रीनवरच तू खेळशील
फ्री स्टाइल कुस्त्या, मोटरकार रेस,
एरोप्लेन रेस, स्टार वॉर
आणि
म्युझियम्समध्ये काचबंद असतील
विटीदांडू, कंचे, लगो-या, सागरगोट्या, डिग्गर 
आणि 
क्रिकेटच्या विकेटी,बॅटा, बॉलसुद्धा.
वखट, रेंड, मुंड, नाल, अबीत, आहार, टेक्या
ही मापे आहेत कशाची ?
यावर एखादा क्रीडाप्रेमी संशोधन करून
पीएच्. डी. मिळवील.
तारूण्यात
व्हिडिओ-फोनवर प्रेयसीशी बोलताना 
तू पाहशील तिचा ब्युटीपार्लरने लिंपलेला
पांढुरका चेहरा स्क्रीनवर,
तेव्हा
मिळतील बाजारात
इंस्टंट फूडच्या भेसळीचे कॅप्सूल्स
त्यासोबत घ्यावयाच्या
डायजेस्टिव्ह टॅबलेटसह.
सकाळी वेळ नसेल तुला
घंटी वाजवून साग्रसंगीत पूजा करायला
तर 
या कामावर तू नेमशील
एखादा यंत्रमानव
- शंकाच नाही.
अशी का होईना
पण पूजा करशीलच तू.
कारण
आर्थिक सुबत्तेनंतर
माणसं धर्मांध झाल्याचा इतिहास असेल
नुकताच ताजा.
यंत्रमानवाने
माणसांचे मुडदे पाडल्याची
वेबसाईट
मिळेल पहायला
इंटरनेटवर
आणि 
शरीरसुखाची
पर्यायी तृप्ती शोधणा-या
नरांचा रिमोट कंट्रोल
असेल
एखाद्या
यंत्रमादीच्या हातात.
टाइम पहायलाही
लागणारा वेळ वाचविण्यासाठी
कॉन्टॅक्ट लेन्सवरच
फिट केले असेल
एखादे इलेक्ट्रानिक मायक्रो वॉच.
तेव्हा विकायला काहीच शिल्लक नसेल 
घरात
आणि 
श्रम विकूनही भागणार नाहीत सांजा;
तर 
स्वत:साठी एक बाकी ठेवून
माणसं-बाया
सर्रास
विकतील दुसरी किडनी,
मृत्युच्या जबड्यातून
एखाद्या श्रीमंताला काढून
त्या जागी
स्वत:ला ठेवत.
इतक्या प्रगल्भ सभ्यतेचा
नागरिक झाल्यावरही
माझ्या तान्ह्या मुला,
तुझे मन राहिलेच अशांत
तर तू जाशील कुठे ?
भगवतगीतेजवळ ?
की
महासंगणकाजवळ ?
कुठेही जा
पण जेवून घेशील आधी.
कारण 
एकच गोष्ट आहे सनातन
आणि तेवढीच आहे शाश्वत:
ईश्वराइतकी अनंत दु:खे,
फुलांच्या आयुष्याएवढे सुख;
विश्वाला व्यापून शिल्लक आहे
मुंगीच्या पोटात इवली भूक.


रेखाचित्रे : श्रीधर अंभोरे
***********************
**********

३ टिप्पण्या:

manojsawkar म्हणाले...

Respected Sir,
Best poem I have ever read.


Thanking you,
manojsawkar.blogspot.com

dr.shrikrishna raut म्हणाले...

आभार.

श्यामलाल दुधाळे म्हणाले...

छान रचना आहे सर.... एकदम वास्तव