जागी हो

पोरी,
डोळे भरून
बघून घे मला
शेवटची.

मला पाहून भिऊ नकोस
जरी आज
काळी ठिक्कर पडली माझी त्वचा
आणि
हा देह संपूर्ण विद्रूप झाला असला
तरी पहिल्या रात्री
याच देहावर
वेडापिसा झाला होता गं
तुझा बाप.

-नाही नाही
माझ्याच नजरचुकीने पेटला माझा पदर
होय खरंच सांगते मी
मी पोलिसांनाही असंच सांगितलं.
कालच
वटसावित्रीची पूजा केलीय मी,
तुक्याशी खोटं कशाला बोलू?

झर्‍यासारखा
फुटू पाहतोय माझा पान्हा
आणि
तुक्या चिमुकल्या ओठांचा वत्सल स्पर्श
कोणी पारखा केलाय
माक्या स्तनाग्रांना?
मला गिळू पाहते ही झोप
अन्‌ शेजारच्या घरातूनही येतो आहे
बघ
रॉकेलचा वास.

पोरी,
तू अशी
गाढ झोपू नकोस पाळण्यात;
जागी हो!

1 टिप्पणी:

Dhananjay kamble म्हणाले...

व्वा..!
लाजवाब वाभाडे!