आपल्याच
उजव्या हाताला म्हणावं बाप
आणि
डाव्या हाताला माय.
तेच
घेतात आपला चेहरा
त्यांच्या ओंजळीच्या कुशीत;
जगापासून आपली आसवे झाकण्यासाठी.
करतात आपले सांत्वन,
पुसतात अश्रू
बोटाच्या रुमालाने.
हमसून हमसून
घशात अडकलेल्या हुंदक्यासाठी
तेच पेश करतात
थंडगार पाण्याचा प्याला
आणि
तापलेल्या डोक्याला
थापटून थोपटून तेच करतात शांत;
केसातून त्यांची वत्सल बोटे फिरवीत.
अंगुली-निर्देश करून
तेच होतात आपले सच्चे वाटाडे;
ज्या वाटेवर आपण चालावे बिनधास्त.
प्रवासाच्या प्रारंभी तेच उभे असतात
आपल्या स्वागताला
गुलाबपुष्प घेऊन
कोणत्याही समारंभाशिवाय.
आणि
प्रवासात तेच काढतात
आपल्या पायात मोडलेले काटे
कोणत्याही विनंतीविना.
एखाद्या लढाईत
दोन-दोन हात करताना
त्यांचे प्रयत्न पडले अपुरे
आणि
पराजित रुळावर
आपले मुंडके झाले धडावेगळे;
तर त्यांनीच घेतलेली असते
आपली मृत्यूपूर्व जबानी
कागदाच्या छोट्याशा चिटो-यावर-
राजीखुशीने केलेल्या आत्महत्येचा
आळ
कुणावरही येऊ नये म्हणून.
स्वार्थाच्या बाजारात
पाण्यापेक्षा पातळ असतं रक्त
आणि विकाऊ असतं
अच्छाअच्छांचं इमान
हे त्यांना चांगलंच असतं ठाऊक;
म्हणून ते करतात दस्तखत
आपल्या मृत्युपत्रावर.
त्यांच्या इतकं जवळचं
नसतंच आपलं कुणी;
आपल्यावतीने तेच उमटवतात
डाव्या अंगठ्याची निशाणी
मानवतेच्या जाहीरनाम्यावर
ज्यात असतं स्पष्ट नमूद :
रेणुहूनही तोकडा
मनुष्यप्राणी
या विराट ब्रह्मांडामध्ये
अगदी एकटा आहे.
२ टिप्पण्या:
अगदी खरं आहे.
KAVITA KHUP ARTH PURN AAHE
टिप्पणी पोस्ट करा