अखेर विश्व शरण ये तुला तथागता

अखेर विश्व शरण ये तुला तथागता;
तुझ्याशिवाय लाभली कुणा न शांतता.

अजून युद्ध रोजचे नवीन पेटते;
विनाशपर्व सारखे जगास जाळते;
पुन्हा घडू नये इथे हिरोशिमा अता.

तहान दुःख निर्मिते कळे न माणसा;
पुन्हा पुन्हा खुणावते मनास लालसा;
पिढ्या कितीक संपल्या अशा अजाणता.

अधीर लोचने किती पहावया तुला;
तुझाच धम्मसूर्य हा जगी प्रकाशला;
पहाट थांबली नवी तुझ्याच स्वागता.

('अस्मितादर्श'धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी विशेषांक 06 वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: