अश्वमेध

घोड्या,
अरे वेड्या,
असा कुठे चाललास
तुफान दौडत,
वायावर उडत,
चौखूर उधळत.

वेशीच्या बाहेर पडेपर्यंत
हे ठीक होतं.
आता
गावशीव ओलांडल्यावर
एकेका पाऊल कसं
भुई फुंकत फुंकत
सावध पडलं पाहिजे.

त्या लगामाची
चिंता करण्याचं कारण नाही.
तो स्वाराच्या हातात
नाममात्रच आहे.
वाटचालीविषयी स्वार झालाय बिनधास्त
आणि
त्याची मांड पडत आहे सैल.

मधे आहेत भरपूर
हिरवीगार कुरणं
चारा खाता खाता
खुरांना बसवून यायच्या
नाला पिवळाधम्म
न विसरता.

वजीराच्या उदारतेची कीर्ती
आहे दिगंत.
त्याच्या मर्जीतला होऊन राहिलास
तर तुझ्या अरबी वंषाच्या
सतरा पिढांना आरामात पुरतील
एवढे काबुली चने हात जोडून
उभे राहतील
तुझ्या दिमतीला.
आणि
राणीसोबत झोपण्याची
तुझी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होईल
पण
शीर
यज्ञार्पण केल्यावर.

तूर्तास
वजीर बैस म्हणतो
तर बैस!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: