स्वप्नांचे अपघात

गौरांगी अभिसारिका उमलली शेजेवरी मोगरा
राधाकृष्ण दिठी-मिठीत विरती शृंगार येता भरा
तो थांबेल कसा अनाहत ध्वनी जो आतुनी वाजतो,
मागे सार किती तरी किणकिणे तेव्हा चुडा लाजरा.
.
मौनाचे दिप लागता उजळतो  छातीतला कोपरा
स्पर्शाच्या पणतीत देह जळतो ज्योतीपरी कांपरा
दुःखाच्या वडवानलात बुडता काळ्यानिळ्या सागरी,
श्वासांच्या हळव्या लयीत घडतो गर्भात मोती खरा
.
काचाचे मन लाभता तडकले कोरे किती आरसे
पाऱ्याचे नभ न्याहळित बसणे दैवात होते जसे
रक्ताला म्हणती सुवास सुटतो होता गुलाबी व्यथा,
स्वप्नांचे अपघात छान दिसती डोळ्यात पाहू कसे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: