अटळ

स्वर गवसत नाही काय घालू उखाणे
निपचित पडलेले बंद ओठात गाणे
शहर जळत आहे वाहतो उष्ण वारा
कमळ चिमत जाते शुष्क वेली प्रमाणे

करवत फिरल्याने दोन होतात फाका
मन उसवत तैसे कोण घालेल टाका
परत पदर फाटे कोवळ्या रेशमाचा
जखम भरत नाही लागतो तोच धक्का

तटतट तुटणारा  जीव कोणा कळेना
नयन झरत जाती वांझ आशा फळेना
विखरत उडणारी राख साऱ्या फुलांची
नखभर उरलेली कां चिता ही जळेना ?

घट विरघळलेला ओल मातीत नाही
हिरवळ न जराशी आज दृष्टीत काही
हसत हसत कोणी धूळ डोळ्यात फेके
मरण अटळ आहे - कोण देणार ग्वाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: