अरे पावसाच्या देवा

अरे पावसाच्या देवा
असा रुसू नको बापा
धरतीच्या पोटातून
पहा निघतात वाफा

अरे पावसाच्या देवा
नको पोटावर मारू
गाई -बैलांना उपाशी
सांग आता काय चारू ?

अरे पावसाच्या देवा
डोळे उघड रे नीट
थेंबाथेंबासाठी करे
मायबाई पायपीट

अरे पावसाच्या देवा
अशा मारू नको थापा
कधी येशील येशील
जीव गेल्यावर बापा !

अरे पावसाच्या देवा
दे रे आम्हा जीवदान
तुझ्या मायच्या दुधाची
तुला घालतो मी आण

- श्रीकृष्ण राऊत
२२ ऑगष्ट २००१
गणेश चतुर्थी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: