पाणी-कुंकू

चिडी-मुंगीला
दाणा-पाणी आणणार्‍या
वरुणा,
अजून
तेवढ्याच
श्रद्धेने वाहतोय आम्ही
पाणी-कुंकू
मृगाच्या किड्यांवर.

जरी
वार्‍यापाण्याचा
दोन दोन दिवस फिरत नाही
पिठाच्या चक्कीचा पट्टा
आणि
महागतात हरघडी तांदुळ, हरबरे.

दुकानात
रात्री उशिरा आलेल्या आट्याला
दिसत नाही सकाळ
अन्‌
नळाची सतत रोडावणारी धार
भांडणे लावते भरदुपारी.

आम्ही म्हणतो,
पाणी एवढे गढूळ कसे?
तर पाण्यात असते
भरपूर ब्लिचिंग पावडरची योजना
पोटात काहीच काय-
पण-
जंतू देखील जाऊ नयेत म्हणून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: