श्रावण

१.

घनगर्द अभ्रांच्या
काळ्या मांडवाखाली
लादलेल्या करांसारखी
बरसणारी ही श्रावणझड.

ढेकळागत
जागच्या जागी विरत जाणारी
मातीची माणसं
नि टपोर थेंबांच्या मार्‍यात
पंख विस्कटून पडलेल्या
इवलाल्या चिमण्यांचा सडा
वडाच्या झाडाखाली.

संपावर असावी तशी
घरांच्या कोपर्‍यात
ढिम्म आळसावलेली खुरपी
अन्‌
विळे गेलत जंगलात
गवत कापायला;
पोत्याची घोंगडी करुन
त्याखाली अंग लपवीत.

गवताची मूठ घेता घेता
हातातून
सर्रकन नाग निघून जाता जाता
भरझडीत
अंगाला दरदरून फुटतो घाम
मोडलेले काटे विसरून
जीव वाचल्याचं समाधान
ओढून आणते पाय घरी़
डोक्यावर आयुष्याचं ओझं कायम
गवताचा भारा होऊन.

हातातोंडाच्या
भेटीतील अंतर मिटविण्यासाठी
आट्याला जोडली जाते
अंबाडी-फांजीच्या भाजची पुरवणी.

तव्यावर हिरवी भाकर
कोळ्‌ळयाशाचा रिता गंज
नुस्ता 'आ' वासून.


२.

क्षमस्व
श्रावणा
क्षमस्व!
तुला
बालकवीच्या डोळ्यांनी
पाहू शकत नाही
मी.

चैतन्यमयी पोपटी वर्ख
कसा ओढू मी पापण्यांवर?
हिरव्या पदराचं फाटकं आभाळ
अंगावर कोसळताना
मी झालोय संपूर्ण अचेतन.

वावरात
पोटामागे धावताना
मायच्या पायाला
जंगलेल्या खिळ्याच्या देठावर
लालबुंद रक्तफुल
आणि
धनुर्वातानं केलाय
माक्या तोंडातला घास कडू़.

मी झालोय बेलाचं झाड
ज्याची तमाम पानं
ओरबाडून नेली
आकाशातल्या हातांनी
श्रावणोत्सवात
महादेवाच्या पुजेला
भुंड्याभुंड्या फांद्यातून
उठलाय ऊरफोड गल्बला
ज्यानं
माझ घर बांधलंय उन्हात
आणि
सावली
तर पार क्षितिजापल्याड गेलेली.

झडीत
टपटप
गळणार्‍या गवती छताने
ठिकठिकाणी जडवून घेतलेत
माझे कोवळे डाळे.

कसा पाहू मी इंद्रधनुष्य?
कसे वाचू तुझे गीत?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: