बाभुळबन

नदीपल्याडचे बाभुळबन
एखाद्या जहरी लसीसारखे
उभरत चालले
या गावाच्या अंगावर.

घरोघर
एकेकाच्या वाढदिवशी
वृंदावनात लावले जात आहे
एकेक बाभळीचे रोप.

बारोमास उन्हाळा असल्यासारख्या
आता
नियमित सुटतात वावटळी
आणि
आखरात रचून ठेवलेले काट्यांचे फास
रोलरसारखे
रस्त्यात सापडेल ते दाबत सुटतात.

नजरकैदेतल्या पहार्‍यासारख्या
डोक्यापर्यंत खाली आलेल्या
या फांद्यांचाही काही नेम नाही;
कधी काळी हिम्मत करून
आपण खालची नजर वर केली
तर खप्पकन्‌
एखादा काटाच खुपसायचा डोळ्यात.
वाळलेल्या काट्यांचा
पांढराशुभ्र सुरक्षाकोष
स्वतःभोवती घट्ट लपेटून
नवे वारसदार उबवितांना
मादीच्या पायात काटा खुडला
तिने तुकड्यातुकड्यांनी
काट्याला खुडले.

मग एका काळ्या दिवशी
दुखावलेल्या काट्यांनी
मादीचाच काटा काढला.

गावकर्‍यांच्या
अनवाणी पावलांचे
आता काय होईल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: