भोंडी बुच्ची लेकबाय

पैल्या आखाडीले
लेकबाय आली माय
माहेरी.

जरतारी पदराचा
तिच्या लग्नाचा शालू,
जरीच्या काठाचं झ्यांपर,
नव्या चपलाचा जोड,
एकदानीचा गोंडा,
नखपालीसची कुप्पी,
गंध-पावडर,
वटीचं सामान...
नवरीचा अख्खा साज
घातला माय ह्या पुराच्या मढ्यावर!

आता
भोंडी-बुच्ची लेकबाय
कोणत्या तोंडानं सासरी धाडाव?

आपलं तं काम असं :
हातावर आन्नं
अन्‌ पानावर खानं!

- श्रीकृष्ण राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: