कवी

कविता
कागदारवर उतरवतांना
परग्रहावरून उतरणार्‍या तबकडीसारखे
काहीतरी उतरते
कवीवर.
त्या घ्उतरण्याचीङ झिंग
चढत नाही कवीला म्हणून की काय

कवी
एक जळजळीत पेग
उतरवतो
घशाखाली.
दु:ख, आनंद.
कर्तव्य, जबाबदार्‍या, सामाजिक जाणीव.
बायको, पोरं, नोकरी.
कविता, स्वत:
आणि
जग
कवी बुडवितो घ्एकाच प्याल्यातङ.
- अशावेळी
गोविंदाग्रजांनी
‘काव्य संन्यास’ घेऊ नये तर काय करावे?
कवीला वाटतं :
दारूच्या कारखान्यापासून
कवीच्या घरापर्यंत थेट
‘मद्यवाहिनी’ टाकायला काय हरकत आहे?
खासदार झालेल्या कवींनी
खरं म्हणजे संसदेत
अशी ‘लक्ष्यवेधी’ सूचना मांडायला पाहिजे
ते साले नुसत्या खुर्च्या तोडतात दिल्लीत.
चांगली कविता लिहिण्यासाठी प्यावे लागते मद्य
न पिता लिहिण्याचे असते सगळे गद्य
अशी गझल ऐकवून
कवी विचारतो गालिब ला :
“तू रोजची किती प्यायचास?”

गालिबने शेर ऐकवण्यासाठी
तोंड उघडण्या अगोदर
त्याच्या तोंडावर बोट ठेवून
तुकाराम देतो कवीला
एक सणसणीत अभंग शिवी.

तोंडावरील बोट झटक्याने बाजूला सारत
आणि नाक मुरडत
गालिब म्हणतो,
“अशा शिव्या-बिव्या
चालत नाहीत बुवा
आमच्या गझलमध्ये!”
पोटचं पोरगं
वाया गेल्यावरही त्याच्याविषयी
आईच्या डोळ्यात दाटून यावी अपार करूणा :
- तसे ज्ञानेश्र्वर पाहतात कवीकडे.

कवी
ब्लॅकनं घेतो
गॅस कनेक्शन, सिनेमाची तिकीटे.
ब्लॅकनंच घेतलेल्या
तोतया रिझर्व्हेशनवर करतो रेल्वे प्रवास.
विद्यापीठातील ओळखीने
वाढवून घेतो मुलीचे मार्क्स,
मोठ्ठी लाच देऊन
लावतो मुलाला नोकरी.
प्रतिभेने प्रभावित झालेल्या कुमारिकेचा
करवितो गर्भपात
आणि
बायकोच्या अंगाप्रत्यांगावर लावतो
सिग्रेटचे चटके.

कवी
कधी नम्रता वापरतो शस्त्रासारखी
तर
कधी शस्त्रं झेलतो फुलांप्रमाणे.
कवी
असला शुद्घीवर
तर मुलांना सांगतो
चार गोष्टी युक्तीच्या
एका कवितेत-
तुम्ही व्हा एवढे मोठे की
तुमची ओळख नसावी
‘माझी’ मुलं म्हणून
तर
माझी ओळख असावी
‘तुमचा’ बाप म्हणून.

कविता ऐकल्यावर -
वर्तमानपत्रात पहिल्या पानावर
फोटोसह
स्वत:चा भ्रष्टाचार जाहीर झाल्यावर
तडफडणार्‍या
सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यासारखा
तळमळतो
कवीचा बाप स्वर्गात.
आणि आसनांची मोडतोड करून
निषेधाच्या घोषणा देत
सभागृहातून बाहेर पडावा श्रोत्यांचा लोंढा
तशी बाहेर पडताहेत सामान्य माणसं
कवीच्या कविता संग्रहातून
अन्‌ वाट फुटेल तिकडे धावत सुटताहेत
धूम ठोकून. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: