पुढची तारीख

प्राणापेक्षाही न्याय प्रिय ज्यांना
असे तुम्ही
न्यायाधीश महाराज रामशास्त्री,
महाभारताचा अपराधी
गांधारीपुत्र दुर्योधन
न्याय मागीत आहे
तुमच्या न्यायालयात.

राजा नको आंधळा
म्हणून माझ्या वडिलांच्या अपंगत्वावर बोट ठेवून
काही राजकारणी मुत्सद्यांनी
माझ्या काकांचा केला राज्याभिषेक.
पुढे काकांच्या मृत्यूनंतर
राजकुमार लहान आहेत या सबबीवर
त्याच मुत्सद्यांनी
माझ्या त्याच आंधळ्या वडिलांना राजा बनविले.

मोठा झाल्यावर
मी राज्य मागू लागलो वारसाहक्काने तर
मध्यंतरी काही वर्षे काकांनी राज्य कसले म्हणून
कुळ कायद्याने मान्य केला
काकांच्या मुलांचा हक्क
तुम्ही म्हणाल,-
केवळ हक्क सांगून उपयोग नाही;
लायकी पाहिजे.
तर युद्घानंतर
लहानग्या परीक्षिताला गादीवर बसवितांना
त्याची कोणती लायकी सिद्घ झाली होती?
इतिहास असतो
जिंकणार्‍यांचा भाट
आणि हारणार्‍यांचा निंदक
हे मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे असे नाही
आणि
लायकी या शब्दांचे मूर्तिमंत विरूद्घार्थ
या हस्तीनापुरानेही काही कमी पाहिजे नाहीत.
तर
न्यायाधीश महाराज,
पद राजाचे असो की सेवकाचे;
महत्त्वाचे काय?
हक्क की लायकी?
अनेक खलबतं झाली
पण ठरत नाही नक्की
आणि
अभिमन्यूपेक्षाही कोवळ्या आत्मदहनांचा
निश्चित आकडा सांगायला
तयार नाही कोणताच कोतवाल
म्हणून
मी आलोय तुमच्या न्यायालयात
आज मला
न्याय पाहिजे महाराज,
न्याय!
पुढची तारीख नको
पुढची तारीख नको! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: