भारतमाता

रेखाचित्रातील
रेषेचे काळेभोर वळण
तसे कुबड
तुझ्या पाठीला
मला माफ कर मा,
त्याला सरळ करण्याचे दिव्यत्व
नाही माझ्या स्पर्शात
मी तर केवळ नाममात्र कृष्ण.

तुझ्या पुढ्यात
मी उभा : नवाडा पाहुणा.
तर
वाळून कोळ झालेल्या
तेलिया बाभळीच्या फांदीसारखा
तुझा काळाशार अशक्त हात
नव्या कोर्‍या, खडीदार,
फिकट गुलाबी पदराशी झुंजत
त्याला डोक्यावर ओढण्याचा
करतो आटोकाट प्रयत्न
तशा किणकिणत
ढोपरापर्यंत सहज घरंगळतात
हिरव्यागार बांगड्या.

या घरंदाज वळणाने
मी गलबलतो खोलवर तीळतीळ तुटत
खंड खंड रेघेसारखा.
तेव्हा बाबा
साहेब म्हणत मला सांगत असतात
सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाचे पंचांग
आणि
मांगिणीच्या धडावर
रेणुकेचे शीर चिकटल्याची
पुरातन गोष्ट;
याच अवकाशात असतं सुरू
तुझ्या गाठोड्यागत बसण्याचं
ठसठसीत लाल कुंकवाच्या कपाळावरचे
ढवळे केस उपटणं
जैनमुनीवाणी.

तुझ्या
आतल्या बाजुला वळलेल्या
अंगठ्याला शेजार
चांदीच्या शुभ्र जोडव्याचा
आणि
तुझ्या समचरणात तर
साक्षात तथागतच वस्तीला.

माझी व्याधी
टेकवू शकत नाही मस्तक
तुझ्या चरणावर;
तशीच
तूही उभी होऊन
फिरवू शकत नाही कष्टाळू हात
माझ्या मुखावरून
मायेने.

मा,
या तृष्णेच्या पोटात
दुःखाचा गर्भ
आडवा होताना ऐकतो
पिंपळाची सळसळ :
दुःखम्‌ सरणम्‌ गच्छामी.

२ टिप्पण्या:

Dhananjay kamble म्हणाले...

मी तर केवळ नाममात्र कृष्ण...
जबरदस्त!

Dhananjay kamble म्हणाले...

मी तर केवळ नाममात्र कृष्ण...
जबरदस्त!