स्वप्नांचे अपघात
●
दिवाळीच्या घर स्वच्छता मोहिमेत
एका डायरीत सापडलेले 'तभा 'चे कात्रण
बहुधा ते १९८८ चे असावे.
कवितेचे वृत- शार्दूलविक्रीडित
●
स्वप्नांचे अपघात
.
गौरांगी अभिसारिका उमलली शेजेवरी मोगरा
राधाकृष्ण दिठी-मिठीत विरती शृंगार येता भरा
तो थांबेल कसा अनाहत ध्वनी जो आतुनी वाजतो,
मागे सार किती तरी किणकिणे तेव्हा चुडा लाजरा.
.
मौनाचे दिप लागता उजळतो छातीतला कोपरा
स्पर्शाच्या पणतीत देह जळतो ज्योतीपरी कांपरा
दुःखाच्या वडवानलात बुडता काळ्यानिळ्या सागरी,
श्वासांच्या हळव्या लयीत घडतो गर्भात मोती खरा
.
काचाचे मन लाभता तडकले कोरे किती आरसे
पाऱ्याचे नभ न्याहळित बसणे दैवात होते जसे
रक्ताला म्हणती सुवास सुटतो होता गुलाबी व्यथा,
स्वप्नांचे अपघात छान दिसती
डोळ्यात पाहू कसे ?
● श्रीकृष्ण राऊत
शार्दूलविक्रीडित-
.
शार्दूलविक्रीडित हे एक अक्षरगणवृत्तआहे. ह्या वृत्ताच्या प्रत्येक चरणात १९ अक्षरे येतात. यति बाराव्या अक्षरावर येतो. ह्या वृत्ताचे गण म-स-ज-स-त-त-ग असे येतात.
.
अक्षरगण -
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
.
लगावली -
.
गागागा ललगा लगाल ललगा गागाल
गागाल गा.
महाराष्ट्रातील हिंदुधर्मीयांच्या विवाहांत म्हणण्यात येणारी मंगलाष्टके ही शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात.
................................