डिसेंबर ब्याण्णवचे मर्ढेकर

पायांखाली माती नाही,
अस्मानाशी तुटले नाते;
अधांतराची उलटी गंगा
पुन्हा एकदा गोते खाते.


देव्हार्‍यातिल वीज-निरांजन
अखंड तेवत ठेवी बंधू;
संगणकाच्या पडद्यामागे
मंत्रमुग्ध पण त्याचा मेंदू.


बुडास पक्क्या फुटे शेपटी,
सुपीक डोके उगवी शिंगे;
घराघरातिल जंगल लावी
धार नखांना,दातासंगे.


धर्म-राज हे सत्य सांगती:
मादी म्हणजे केवळ मादी;

नंग्या तलवारींनी केली
भरबाजारी नग्न द्रौपदी.

३ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

सुरेख

आशा जोगळेकर म्हणाले...

कठोर पण सत्य. सुंदर कविता.

dr.shrikrishna raut म्हणाले...

मा.हरेकृष्णजी / आशा जोगळेकर ,
मन:पूर्वक आभार.