दोन शब्द बोलत नाही,
चार पावलं चालत नाही;
नारळाप्रमाणे मस्तक फोडले
तरी जागचा हालत नाही.
सूर्य तिला वाळवतो,
वारा तिला पळवतो,
पाणी तिला नेते वाहून;
कोरड्या डोळ्यांनी तो
सगळे घेतो पाहून.
रागावली की शिव्या देते;
सुखावली की ओव्या गाते.
कोणी किती निंदा केली
तरी त्याला सोडत नाही;
त्याचे-तिचे नाते काय?
प्रश्न तिला पडत नाही.
आहे-नाहीच्या पल्याड
ती त्याला चाहते;
बाहेरचा पिच्छा सोडून
आत त्याला पाहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा