गेला फुटून ऐना


 

गेला फुटून ऐना...

●

कवितांची एक जुनी वही सापडली.एका पानावर कविता ... शीर्षक : गेला फुटून ऐना... कवितेखाली तारीख ७ जानेवारी १९८१... दोन वर्षानंतर १९८३ मध्ये सिंधुताईंशी भेट झाली... सिंधुताईंचं पाठांतर अफाट... बहिणाबाई, शांता शेळके, ग. दि. माडगुळकर,सुरेश भट यांच्या काही कवितांना  लोकगीतांच्या सुरावटीत गाऊन सादर करण्याची त्यांची  अनोखी शैली श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घ्यायची... माझ्या वहीचे वाचन करता करता त्यातली एक कविता सिंधुताई गुणगुणू लागल्या... पुढे त्यांनी शेकडो वेळा त्यांनी ती कविता मंचावरून सादर केली... हजारो श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला... आज अडतीस वर्षानंतरही त्या टाळ्यांचा पाऊस कानात अजूनही... अगदी काल ऐकल्यासारखा  निनादतो...

●

गेला फुटून ऐना स्वप्नात जीवनाचा

हा स्वप्नभंग ऐसा होऊ नये कुणाचा 


येता तुफान वारे गेली बुडून होडी

गुंत्यात गुंतलेली सुटली कधी न कोडी

डोळ्यास का दिला तू हा शाप श्रावणाचा


तेव्हा फुलास गेल्या तुडवून पायवाटा

त्याचा अजून माझ्या सलतो उरात काटा

जळतो अखंड वणवा माझ्या मुक्या मनाचा


सारे झरे सुखाचे आहे त आटलेले

शिवता मला न आले आयुष्य फाटलेले 

मी दुःखमान्य झालो सम्राट यातनांचा


● श्रीकृष्ण राऊत 

.

स्वर गवसत नाही

 स्वर गवसत नाही

काय घालू उखाणे

निपचित पडलेले

बंद ओठात गाणे

शहर जळत आहे

वाहतो उष्ण वारा

कमळ चिमत जाते

शुष्क वेली प्रमाणे


करवत फिरल्याने 

दोन होतात फाका

मन उसवत तैसे

कोण घालेल टाका

परत पदर फाटे 

कोवळ्या रेशमाचा

जखम भरत नाही

लागतो तोच धक्का


तटतट तुटणारा 

जीव कोणा कळेना

नयन झरत जाती 

वांझ आशा फळेना

विखरत उडणारी 

राख साऱ्या फुलांची

नखभर उरलेली कां

चिता ही जळेना ?


घट विरघळलेला

ओल मातीत नाही

हिरवळ न जराशी

आज दृष्टीत काही

हसत हसत कोणी

धूळ डोळ्यात फेके

मरण अटळ आहे -

कोण देणार ग्वाही.


('अनुष्टुभ' मध्ये प्रकाशित )

.

● श्रीकृष्ण राऊत ●



        डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊत

  • जन्म :
  • १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )
  • शिक्षण :
  • एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी.(वाणिज्य)
  • व्यवसाय :
  • माजी वाणिज्यविभाग प्रमुख, 'श्री शिवाजी महाविद्यालय,अकोला
  • प्रकाशित पुस्तके :
  • ‘गुलाल’(१९८९ )
  • गुलाल आणि इतर गझला
  • (प.आ.२००३ दु. आ.२०२०)
  • एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह( प.आ. २००१ दु. आ.२०१८ )
  • ‘चार ओळी तुझ्यासाठी’ (२००३ ब्रेल लिपीत २००७ )
  • 'तुको बादशहा' (२o१५ )
  • 'चकव्यातून फिरतो मौनी ' गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मान ग्रंथ ( संपादित २o१८ )
  • 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' (२o१९ )
  • 'गझलाई' (२o१९ )
  • 'मेळघाटच्या कविता (२०२२ )
  • गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र ( २०२५ )
  • पुरस्कार :
  • ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह प्रकाशित.या संग्रहाला वि.सा.संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति पुरस्कार, म.सा.प.चा कवी यशवंत पुरस्कार,पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार,भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,संजीवनी खोजे स्मृति पुरस्कार,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,तुका म्हणे इ.पुरस्कार.
  • मौलिक मराठी गझल लेखनाकरिता बांधण जन प्रतिष्ठान,मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार. २०११
  • मराठी गझलमधील विशेष योगदानाबद्दल यू आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार. २०१४
  • 'तुको बादशहा' अभंगसंग्रहाला वर्ध्याच्या दाते संस्थेचा संत भगवानबाबा काव्य पुरस्कार २०१७
  • स्व. सूर्यकांतादेवी पोटे ट्रस्टचा साहित्यव्रती पुरस्कार २०२०
  • उल्लेखनीय :
  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश.
  • साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त.
  • ‘राघूमैना’(१९८२) या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन.
  • ‘तू तिथे असावे’ (२०१८)या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन.
  • आशा भोसले, सुरेश वाडकर,उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे,दिनेश अर्जुना,मदन काजळे,रफिक शेख या नामवंत गायकांच्या स्वरात ध्वनीफिती,सीडीत अनेक गझल,कविता समाविष्ट.
  • श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती निर्मित,राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' ह्या चित्रपटाकरिता पटकथा,संवाद,गीत लेखन
  • भ्रमण ध्वनी : 8668685288


स्वप्नांचे अपघात

स्वप्नांचे अपघात
● 
दिवाळीच्या घर स्वच्छता मोहिमेत
एका डायरीत सापडलेले 'तभा 'चे कात्रण
बहुधा ते १९८८ चे असावे.
कवितेचे वृत- शार्दूलविक्रीडित
● 
स्वप्नांचे अपघात
.
गौरांगी अभिसारिका उमलली शेजेवरी मोगरा 
राधाकृष्ण दिठी-मिठीत विरती शृंगार येता भरा 
तो थांबेल कसा अनाहत ध्वनी जो आतुनी वाजतो, 
मागे सार किती तरी किणकिणे तेव्हा चुडा लाजरा.
.
मौनाचे दिप लागता उजळतो  छातीतला कोपरा 
स्पर्शाच्या पणतीत देह जळतो ज्योतीपरी कांपरा
दुःखाच्या वडवानलात बुडता काळ्यानिळ्या सागरी,
श्वासांच्या हळव्या लयीत घडतो गर्भात मोती खरा 
.
काचाचे मन लाभता तडकले कोरे किती आरसे 
पाऱ्याचे नभ न्याहळित बसणे दैवात होते जसे
रक्ताला म्हणती सुवास सुटतो होता गुलाबी व्यथा,
स्वप्नांचे अपघात छान दिसती
डोळ्यात पाहू कसे ?

● श्रीकृष्ण राऊत

शार्दूलविक्रीडित-
.
शार्दूलविक्रीडित हे एक अक्षरगणवृत्तआहे. ह्या वृत्ताच्या प्रत्येक चरणात १९ अक्षरे येतात. यति बाराव्या अक्षरावर येतो. ह्या वृत्ताचे गण म-स-ज-स-त-त-ग असे येतात.
.
अक्षरगण -
मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
.
लगावली -
.
गागागा ललगा लगाल ललगा गागाल
गागाल गा.

महाराष्ट्रातील हिंदुधर्मीयांच्या विवाहांत म्हणण्यात येणारी मंगलाष्टके ही शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात.
................................


अटळ

स्वर गवसत नाही काय घालू उखाणे
निपचित पडलेले बंद ओठात गाणे
शहर जळत आहे वाहतो उष्ण वारा
कमळ चिमत जाते शुष्क वेली प्रमाणे

करवत फिरल्याने दोन होतात फाका
मन उसवत तैसे कोण घालेल टाका
परत पदर फाटे कोवळ्या रेशमाचा
जखम भरत नाही लागतो तोच धक्का

तटतट तुटणारा  जीव कोणा कळेना
नयन झरत जाती वांझ आशा फळेना
विखरत उडणारी राख साऱ्या फुलांची
नखभर उरलेली कां चिता ही जळेना ?

घट विरघळलेला ओल मातीत नाही
हिरवळ न जराशी आज दृष्टीत काही
हसत हसत कोणी धूळ डोळ्यात फेके
मरण अटळ आहे - कोण देणार ग्वाही.

अरे पावसाच्या देवा

अरे पावसाच्या देवा
असा रुसू नको बापा
धरतीच्या पोटातून
पहा निघतात वाफा

अरे पावसाच्या देवा
नको पोटावर मारू
गाई -बैलांना उपाशी
सांग आता काय चारू ?

अरे पावसाच्या देवा
डोळे उघड रे नीट
थेंबाथेंबासाठी करे
मायबाई पायपीट

अरे पावसाच्या देवा
अशा मारू नको थापा
कधी येशील येशील
जीव गेल्यावर बापा !

अरे पावसाच्या देवा
दे रे आम्हा जीवदान
तुझ्या मायच्या दुधाची
तुला घालतो मी आण

- श्रीकृष्ण राऊत
२२ ऑगष्ट २००१
गणेश चतुर्थी

● श्रीकृष्ण राऊत ●



*जन्म १ जुलै १९५५,
*एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य)
*सध्या अकोला येथे श्री शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभागात सहयोगी प्राध्यापक 

*१९७६पासून गझल, कविता लेखन.*१९८९ला ‘गुलाल’ गझल संग्रह प्रकाशित.*२००१ला ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह प्रकाशित.या संग्रहाला वि.सा.संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति पुरस्कार, म.सा.प.चा कवी यशवंत पुरस्कार,पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार,भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,संजीवनी खोजे स्मृति पुरस्कार,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,तुका म्हणे पुरस्कार.

* मौलिक मराठी गझल लेखनाकरिता बांधण जन प्रतिष्ठान,मुंबईचा
जीवन गौरव पुरस्कार.
*मराठी गझलमधील विशेष योगदानाबद्दल यू आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार.

*२००३ ला ‘गुलाल आणि इतर गझला’ गझलसंग्रह प्रकाशित.*२००३ला ‘चार ओळी तुझ्यासाठी’ हा मुक्तकांचा संग्रह प्रकाशित.*२००७ ला ‘चार ओळी तुझ्यासाठी’ ब्रेल लिपीत प्रकाशित.

*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश.

*साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त.

*‘राघूमैना’ या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन.*आशा भोसले, सुरेश वाडकर,उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे,दिनेश अर्जुना,मदन काजळे,रफिक शेख या नामवंत गायकांच्या स्वरात ध्वनीफिती,सीडीत अनेक गझल,कविता समाविष्ट.

*श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती निर्मित,राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' हया चित्रपटाकरिता पटकथा,संवाद,गीत लेखन.

______________________________________________


म.सा.प.पुणेचा कवी यशवंत पुरस्कार 
कविवर्य हेमंत जोगळेकर यांचेकडून स्वीकारल्यानंतर

______________________________________________

जागी हो

पोरी,
डोळे भरून
बघून घे मला
शेवटची.

मला पाहून भिऊ नकोस
जरी आज
काळी ठिक्कर पडली माझी त्वचा
आणि
हा देह संपूर्ण विद्रूप झाला असला
तरी पहिल्या रात्री
याच देहावर
वेडापिसा झाला होता गं
तुझा बाप.

-नाही नाही
माझ्याच नजरचुकीने पेटला माझा पदर
होय खरंच सांगते मी
मी पोलिसांनाही असंच सांगितलं.
कालच
वटसावित्रीची पूजा केलीय मी,
तुक्याशी खोटं कशाला बोलू?

झर्‍यासारखा
फुटू पाहतोय माझा पान्हा
आणि
तुक्या चिमुकल्या ओठांचा वत्सल स्पर्श
कोणी पारखा केलाय
माक्या स्तनाग्रांना?
मला गिळू पाहते ही झोप
अन्‌ शेजारच्या घरातूनही येतो आहे
बघ
रॉकेलचा वास.

पोरी,
तू अशी
गाढ झोपू नकोस पाळण्यात;
जागी हो!

भारतमाता

रेखाचित्रातील
रेषेचे काळेभोर वळण
तसे कुबड
तुझ्या पाठीला
मला माफ कर मा,
त्याला सरळ करण्याचे दिव्यत्व
नाही माझ्या स्पर्शात
मी तर केवळ नाममात्र कृष्ण.

तुझ्या पुढ्यात
मी उभा : नवाडा पाहुणा.
तर
वाळून कोळ झालेल्या
तेलिया बाभळीच्या फांदीसारखा
तुझा काळाशार अशक्त हात
नव्या कोर्‍या, खडीदार,
फिकट गुलाबी पदराशी झुंजत
त्याला डोक्यावर ओढण्याचा
करतो आटोकाट प्रयत्न
तशा किणकिणत
ढोपरापर्यंत सहज घरंगळतात
हिरव्यागार बांगड्या.

या घरंदाज वळणाने
मी गलबलतो खोलवर तीळतीळ तुटत
खंड खंड रेघेसारखा.
तेव्हा बाबा
साहेब म्हणत मला सांगत असतात
सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाचे पंचांग
आणि
मांगिणीच्या धडावर
रेणुकेचे शीर चिकटल्याची
पुरातन गोष्ट;
याच अवकाशात असतं सुरू
तुझ्या गाठोड्यागत बसण्याचं
ठसठसीत लाल कुंकवाच्या कपाळावरचे
ढवळे केस उपटणं
जैनमुनीवाणी.

तुझ्या
आतल्या बाजुला वळलेल्या
अंगठ्याला शेजार
चांदीच्या शुभ्र जोडव्याचा
आणि
तुझ्या समचरणात तर
साक्षात तथागतच वस्तीला.

माझी व्याधी
टेकवू शकत नाही मस्तक
तुझ्या चरणावर;
तशीच
तूही उभी होऊन
फिरवू शकत नाही कष्टाळू हात
माझ्या मुखावरून
मायेने.

मा,
या तृष्णेच्या पोटात
दुःखाचा गर्भ
आडवा होताना ऐकतो
पिंपळाची सळसळ :
दुःखम्‌ सरणम्‌ गच्छामी.

तुम्ही

तुम्ही
दिलीय मला
हसण्याची मुभा-
दोन इंच लांब
दोन इंच रुंद
आणि
माय मेली तर
रडण्याची सवलत-
पापण्या कोरड्या ठेऊन,
हुंदका न देता.

तुम्ही
बायकोशी भांडू देता मला
मूकचित्रपटाबरहुकूम
मित्रांवर करू देता प्रेम-
माणसी सहाशे ग्रॅम फक्त.

तुम्हीच
ठरवता माझी आवड-निवड;
निश्चित करता माझी श्रद्धास्थानं.

माझा पोषाख
माक्या व्यवसायाशी
होतो की नाही मॅच
याचे सर्टिफिकेट देता
तुम्ही मला
माझ्या
पगाराचा हिशेब
तुम्हालाच जास्ती ठाऊक
माक्यापेक्षाही
माझी भाषा
होऊ नये शिवराळ
तुमच्या दृष्टीने
म्हणून
तुमची सुसंस्कृत कैची
कापते माझी जीभ
वारंवार.

तुम्ही
सतत ओढता रेघ
माक्या पावलांसमोर
भाग पाडता मला
नमस्काराचा रतीब घालायला
आणि
नसलेले शेपूट हलवायला.

फुले

आसमंताचा
संबंध गाभारा
सुगंधित करायला निघालेल्या
फुलांच्या सर्जनशील परागांवर
कोठून येऊन बसतात
ह्या काळया माशा झुंडीझुंडीने?
ज्या शोषून घेतात
आतील मध हळूहळू़.

जसे चालले आहे
निर्बिजीकरण.

पाकळ्यांच्या माना
लुळ्या पडत आहेत
लाजिरवाण्या जगण्यासारख्या
आणि
फुले होत आहेत
प्लॅस्टिकच्या फुलांसारखी
फक्त पत्लॉवरपॉटच्या लायक.

कोवळया उदयापासून
चिमत चिमत मिटणे टाळतांना
फुले अवघडलेली.

भरबहरात
फुलांचे उडणारे रंग पाहून
फुलपाखरंही जातात दुरून,
होतात पाठमोरी.

तशी
फुले अधिकच तिरस्कार करतात
आतील आवाजाचा
त्यांची
समजुतदार सज्ञान देठं
गलबलतात खोलवर
आणि
बागेच्या डोळ्यात
साकळते दंव
वेळी अवेळी
अधूनमधून.

माती

क्षणोक्षणी
ढेकळाढेकळांनी
जागच्याजागी
विरत जाणारी ही माती.

नव्या चुलीचे नवे घर
बांधीन म्हणते आडव्या उभ्या भिंतीचे,
मालकीसाठी लावीन म्हणते भांडणे
सूर्यकिरणातील रंगात
आणि फुटल्या नाकपुडीला
हुंगवील म्हणते
काळे फूलही.

सावत्र गिलाव्याने
बुजवीन म्हणते नळे
त्यावर पोतेरा घेऊन होईन म्हणते
आरशासारखी स्वच्छ़
पावसात परिमळताना.
खेळवीन म्हणते पीक अंगाखांद्यावर.
पाखरांना पाणी पिण्यासाठी
घडवीन म्हणते
नव्या घागरी.

असे
घ्याल तेवढे देईन
म्हणते
द्याल तेवढे घेईन.
देता घेता झिजून
राहीन म्हणते निजून
करून
पाठीचे अंथरूण
पोटाचे पांघरूण.

हाडाहाडांनी कुरकुरत
राहीन म्हणते
निरंतर
भिजत,
कुजत.

सुरुंग

त्यांच्या
पाळीव ज्योतिषांनी
मांडलेल्या कुंडलीत
नसतो ग्रह
इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा.

पण
गोदामात पडलेली
उंदरांची बिळेच
लावत असतात
सुरुंग
कुठल्याही सिंहासनाला.

आधी

आधी
मला एक सांगा
तुमच्या हातांना
मनगटं आहेत की नाहीत?
म्हणजे काय आहे
की आजकाल
बिन मनगटांच्या संकरित बिजाची
पैदास खूप वाढली आहे.

मनगटं असल्यास
त्यात जोर आहे की नाही?
त्याचं असं आहे
की आलकडे अनेक हातांना
प्लॅस्टिकची कचकडी मनगटं आहेत
म्हणून विचारतो.

आणि हो,
नव्या लॉटमध्ये
काही तकलादू मनगटांवर
जन्मताच बांगड्याही आहेत म्हणे
तशा
तुमच्या मनगटांवर तर नाहीत ना?

बाभुळबन

नदीपल्याडचे बाभुळबन
एखाद्या जहरी लसीसारखे
उभरत चालले
या गावाच्या अंगावर.

घरोघर
एकेकाच्या वाढदिवशी
वृंदावनात लावले जात आहे
एकेक बाभळीचे रोप.

बारोमास उन्हाळा असल्यासारख्या
आता
नियमित सुटतात वावटळी
आणि
आखरात रचून ठेवलेले काट्यांचे फास
रोलरसारखे
रस्त्यात सापडेल ते दाबत सुटतात.

नजरकैदेतल्या पहार्‍यासारख्या
डोक्यापर्यंत खाली आलेल्या
या फांद्यांचाही काही नेम नाही;
कधी काळी हिम्मत करून
आपण खालची नजर वर केली
तर खप्पकन्‌
एखादा काटाच खुपसायचा डोळ्यात.
वाळलेल्या काट्यांचा
पांढराशुभ्र सुरक्षाकोष
स्वतःभोवती घट्ट लपेटून
नवे वारसदार उबवितांना
मादीच्या पायात काटा खुडला
तिने तुकड्यातुकड्यांनी
काट्याला खुडले.

मग एका काळ्या दिवशी
दुखावलेल्या काट्यांनी
मादीचाच काटा काढला.

गावकर्‍यांच्या
अनवाणी पावलांचे
आता काय होईल?

पाणी-कुंकू

चिडी-मुंगीला
दाणा-पाणी आणणार्‍या
वरुणा,
अजून
तेवढ्याच
श्रद्धेने वाहतोय आम्ही
पाणी-कुंकू
मृगाच्या किड्यांवर.

जरी
वार्‍यापाण्याचा
दोन दोन दिवस फिरत नाही
पिठाच्या चक्कीचा पट्टा
आणि
महागतात हरघडी तांदुळ, हरबरे.

दुकानात
रात्री उशिरा आलेल्या आट्याला
दिसत नाही सकाळ
अन्‌
नळाची सतत रोडावणारी धार
भांडणे लावते भरदुपारी.

आम्ही म्हणतो,
पाणी एवढे गढूळ कसे?
तर पाण्यात असते
भरपूर ब्लिचिंग पावडरची योजना
पोटात काहीच काय-
पण-
जंतू देखील जाऊ नयेत म्हणून.

श्रावण

१.

घनगर्द अभ्रांच्या
काळ्या मांडवाखाली
लादलेल्या करांसारखी
बरसणारी ही श्रावणझड.

ढेकळागत
जागच्या जागी विरत जाणारी
मातीची माणसं
नि टपोर थेंबांच्या मार्‍यात
पंख विस्कटून पडलेल्या
इवलाल्या चिमण्यांचा सडा
वडाच्या झाडाखाली.

संपावर असावी तशी
घरांच्या कोपर्‍यात
ढिम्म आळसावलेली खुरपी
अन्‌
विळे गेलेत जंगलात
गवत कापायला;
पोत्याची घोंगडी करुन
त्याखाली अंग लपवीत.

गवताची मूठ घेता घेता
हातातून
सर्रकन नाग निघून जाता जाता
भरझडीत
अंगाला दरदरून फुटतो घाम
मोडलेले काटे विसरून
जीव वाचल्याचं समाधान
ओढून आणते पाय घरी़
डोक्यावर आयुष्याचं ओझं कायम
गवताचा भारा होऊन.

हातातोंडाच्या
भेटीतील अंतर मिटविण्यासाठी
आट्याला जोडली जाते
अंबाडी-फांजीच्या भाजची पुरवणी.

तव्यावर हिरवी भाकर
कोळ्‌ळयाशाचा रिता गंज
नुस्ता 'आ' वासून.


२.

क्षमस्व
श्रावणा
क्षमस्व!
तुला
बालकवीच्या डोळ्यांनी
पाहू शकत नाही
मी.

चैतन्यमयी पोपटी वर्ख
कसा ओढू मी पापण्यांवर?
हिरव्या पदराचं फाटकं आभाळ
अंगावर कोसळताना
मी झालोय संपूर्ण अचेतन.

वावरात
पोटामागे धावताना
मायच्या पायाला
जंगलेल्या खिळ्याच्या देठावर
लालबुंद रक्तफुल
आणि
धनुर्वातानं केलाय
माक्या तोंडातला घास कडू़.

मी झालोय बेलाचं झाड
ज्याची तमाम पानं
ओरबाडून नेली
आकाशातल्या हातांनी
श्रावणोत्सवात
महादेवाच्या पुजेला
भुंड्याभुंड्या फांद्यातून
उठलाय ऊरफोड गल्बला
ज्यानं
माझ घर बांधलंय उन्हात
आणि
सावली
तर पार क्षितिजापल्याड गेलेली.

झडीत
टपटप
गळणार्‍या गवती छताने
ठिकठिकाणी जडवून घेतलेत
माझे कोवळे डाळे.

कसा पाहू मी इंद्रधनुष्य?
कसे वाचू तुझे गीत?

रिन्युअल

आपण
एकमेकांना अधूनमधून भेटण्याची
काही निमित्ते शोधून काढुया

तुम्ही तुमच्या मुलीच्या वाढदिवशी
मला फराळाला बोलवा
मी माक्याकडे तुम्हाला
सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाला
बोलवीऩ

उसन्या घेतलेल्या साखर-तेलाप्रमाणे
आपण
आपले देणे-घेणे त्वरित परत करूया़
तुमच्या
फ्रीजमधले आंब्याचा रस घातलेले
आईस्क्रिम खाताना
मी तारीफ करीन
तुमच्या मिसेसच्या सुगरणपणाची
आणि
माक्या घरच्या
स्वीट्सची टेस्ट सांगताना
तुम्ही कौतुक करा
माक्या बायकोच्या होमसायन्सचे

आपण
एकमेकांना
आपले घरभाडेही विचारूया
आणि मग
महागाई, राजकारण, भ्रष्टाचार
यावर चर्चा तर आलीच
एकमेकांचे
अथभिनंदन करण्याचा
तसेच सांत्वनही करण्याचा
तर आहेच आपला आलखित करार

आपण
आहोत एकमेकांचे काळजीवाहू सरकार
तेव्हा आपण एकमेकांना विचारूया,
कसं काय? काही नवल विशेष?''
आणि खोटं खोटं हसून उत्तरही देऊया,
एकदम मजेत! फिकर नॉट!''

हे सर्व करताना
एक अट मात्र कंपल्सरी :
आपण एकमेकांच्या मागे
जमतील तशा
थोड्याफार शिव्याही द्याव्या
एकमेकांना.

बरेच दिवस झालेत
आपण
सहकुटुंब एकमेकांकडे आलो-गेलो नाही
इतक्यातच
तुमच्या मुलाचा वाढदिवस होता ना?
नाहीतर पुढच्या वीकमध्ये आहेच
माझ्या वडिलांचे वर्षश्राद्ध.

आपण
थोडेसे परिचित वगैरे असल्याने
एकमेकांची ओळख विसरू नये
म्हणून निमित्ते शोधुन
रेशनकार्डसारखे रिन्युअल करूया
आपल्या ओळखीचे.

कविता

कवितेला
शमविता येत नाही
कोणतीच शारीरिक भूक;
की तिला काढता येत नाही
एखादा इंटरव्ह्यू कॉल
कवीसाठी
कवितेला पिताही येत नाही
दारु-सिग्रेटसारखे

माणसाला लागणार्‍या
कुठल्याच गोष्टीचा पर्याय
होऊ शकत नाही
कविता़

कवितेला
सावरता येत नाही
वृद्ध बापाचा तोल
मामुली काठी बनून;
की तिला लोटताही येत नाही
म्हातार्‍या मायच्या घशात अडकलेला
शिळ्या भाकरीचा घास

कवितेला होता येत नाहीत
कोणत्याच अपंगाच्या कुबड्या
तिला पुसता येत नाहीत
विधवेचे अश्रू;
की तिला अडवताही येत नाही
आपल्या प्रेयसीचे
दुसर्‍याशी होत असलेले लग्न

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या
कवितेच्या कागदाला
झाकता येत नाही
फाटक्या झ्यांपरातून दिसणारे
तरूण बहिणीचे उघडे अंग;
की मासिकात छापून आलेल्या
कवितेच्या
चतकोर कात्रणाचे
लावता येत नाही ठिगळ
लहान भावाच्या
ढुंगणावर फाटलेल्या चड्डीला.